विशेष प्रतिनिधि
पुणे : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या भक्तिमय वातावरणात विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील महापालिकेने विसर्जन घाट, कृत्रिम हौद व लोखंडी टाक्यांची सोय केलेली आहे. उत्सवाच्या काळात प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेने या सर्व उपायोजना राबविल्या आहेत. Ganeshotsav
मूर्तिदान संकल्पना, निर्माल्य संकलनातून खत निर्मिती, तसेच शाडू मातीचा पुनर्वापर या सर्व उपक्रमांवर महापालिकेचा यंदा भर असणार आहे. न्यायालयाने पाच फुटांपेक्षा कमी आकाराच्या मूर्ती हौदातच विसर्जित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने विसर्जनासाठी यंदा लोखंडी टाक्यांची संख्या देखील वाढवलेली आहे. 281 ठिकाणी महानगरपालिकेतर्फे एकूण 648 लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लोखंडी टाक्यांसोबतच पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 38 बांधकाम केलेले विसर्जन हौद बांधले आहेत. तसेच, नदीकाठावर एकूण 328 निर्माल्य संकलन कंटेनर उपलब्ध करून दिले आहेत.
महापालिकेच्या या पुढाकारामुळे उत्सवाच्या काळात होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालता येईल. मात्र, यासाठी नागरिकांचा देखील सहभाग आवश्यक असल्याचं प्रशासनाने सांगितले आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीत टाकले जाते. त्यामुळे नदीपात्रातील प्रदूषण वाढते. मात्र गेल्या वर्षी महापालिकेने निर्माल्याचे वेगळे संकलन पाषाण तलाव परिसरात करून, त्यापासून तब्बल 706 टन निर्मलाचे सेंद्रिय खत तयार केले होते. यंदाही याच पद्धतीने खत निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता, उपलब्ध करून दिलेल्या कंटेनर मध्येच जमा करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. Ganeshotsav
केवळ निर्माल्याचे संकलनच नाही, तर शाडू मातीचा पुनर्वापर करण्याच्या दिशेने देखील महापालिकेने पाऊल उचलले आहे. यावर्षी महापालिकेतर्फे ४६ शाडू माती संकलन केंद्रे उभारली गेली आहेत. यात ठिकाणी जमा झालेली माती व मूर्ती पुन्हा मूर्तिकारांना परत दिली जाईल. यामुळे शाडू मातीचा पुनर्वापर होईल, तसेच होणाऱ्या अतिरिक्त प्रदूषणाला देखील आळा बसेल. विसर्जन घाटांवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाची जनजागृती केली जाणार आहे.
गेल्या वर्षी देखील पुणेकरांनी एक लाख ७६ हजार ६७ मूर्तीदान करून पालिकेला दिला होता पुणेकरांचा मागच्या वर्षीचा प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी या संकल्पनेला अधिक बळ देत २००१ ठिकाणी मूर्तीदान केंद्रे उभारले आहेत. यामुळे विसर्जनासाठी पुरेशी व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाच घाटावर गर्दी न करता पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करावे व महापालिकेला सहाय्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी केले आहे. Ganeshotsav
Pune Municipal Corporation is ready for pollution-free Ganeshotsav
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा