विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने पुण्यात डबल धमाका करण्याची तयारी केली आहे. कसबा पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यामुळे शिवसेनेला (ठाकरे गट) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी आज शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) प्रवेश करत आहेत. बाबर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महादेव बाबर हे पुण्यातील महत्त्वाचे नेते मानले जात होते. २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हडपसर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काही महिन्यांपासून ते ठाकरे गटाच्या भूमिका आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज अधिकृतरीत्या शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आज मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, धंगेकर लवकरच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यांनी २०२३ च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
महादेव बाबर यांच्या प्रवेशानंतर आता ठाकरे गटात नाराज नेत्यांची संख्या वाढणार का, आणि रवींद्र धंगेकर यांचा पुढील निर्णय काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ravindra Dhangekar and MLA Mahadev Babar preparing to join the Eknath Shinde Shivsena
महत्वाच्या बातम्या