विशेष प्रतिनिधी
चिंचवड: विद्यमान आमदार अश्विनी जगताप की त्यांची दीर शंकर जगताप हा वाद मिटल्याने गृहकलह संपला असला तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर जगताप यांची वाट खडतरच आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांबरोबरच भाजपचे नगरसेवकही बंडाच्या तयारीत आहेत Shankar Jagtap Faces Tough Road Ahead
अजितदादांनी शब्द फिरवला.. असं म्हणत चिंचवडच्या समर्थकांनीचं थेट अजित पवारांना घरचा आहेर दिला आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या बैठकीतच थेट अजित पवारांबाबत नाराजीचा सूर आळवला गेला. बंडाचा इशारा देतदोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी बंडाची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, दिलीप काळे, चंद्रकांत तापकीर, तानाजी जवळकर, श्याम जगताप, शिरीष काळे, प्रशांत सपकाळ, बापू कातळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही,अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या नेत्यांनी ठराव केल्याप्रमाणे खरंच बंड करणार की त्याचा फटका महायुतीला बसू नये म्हणून अजित पवार या नेत्यांचे बंड थंड करणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने भाजपचा प्रचार न केल्यास पिंपरी विधानसभा मतदार संघात आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा थेट इशारा भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेस अजित पवार गटाने भाजपा उमेदवारांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
एकीकडे राष्ट्रवादी नाराज असताना भारतीय जनता पक्षाच्या नाराज नगरसेवकांची समजूत काढण्याचे आव्हानही शंकर जगताप यांचे समोर आहे. शंकर जगताप हे एकदा नगरसेवक होते. आम्ही तीनवेळा नगरसेवक असल्याचे सांगत उमेदवारीला विरोध करणाऱ्या या नाराज नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
आमदारकी, शहराध्यक्षपद जगताप कुटुंबात, आता पुन्हा जगताप कुटुंबात उमेदवारी कशासाठी? शंकर जगताप हे केवळ एकवेळा नगरसेवक राहिलेत. आमच्या तीन-तीन टर्म झाल्या आहेत. केवळ दिवंगत आमदारांचा भाऊ म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही, अशी भूमिका घेत १५ माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे.
Shankar Jagtap Faces Tough Road Ahead