विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघात माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात द्यावी अशी मागणी विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी केल्यामुळे जगताप कुटुंबातील संघर्ष टळला आहे. Shankar Jagtap will contest from Chinchwad
लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यावर त्यांचे बंधू आणि अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. त्यानंतर अश्विनी जगताप की शंकर जगताप असा वाद सुरू झाला होता. भाजपकडून तिकीट मिळाली नाही तर अश्विनी जगताप शरद पवार गटात जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या.
मात्र आता अश्विनी जगताप यांनीच शंकर जगताप यांचे नाव पुढे केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा वाद मिटला आहे. गेल्या काही महिन्यापासून भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती, त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. “माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी देण्यात द्यावी,” अशी मागणी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. शंकर जगताप यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. अशा परिस्थितीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा राजकीय वारसा मीच असल्याचे सांगत विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभेवर दावा सांगितला होता. तर शंकर जगताप यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मोठ्या राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
चिंचवडमधून मीच लढणार, अशी भावना शंकर जगताप यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून बिनसलं असल्याचीही चर्चा होती. मात्र मागील काही दिवसांपासूनचा हा वाद संपुष्टात आला आहे.