विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड: Sharad Pawar : मिनी बारामती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर आणि महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोलबाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 2017 पर्यंतच्या सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळाले. 2002 ते 2017 या पंधरा वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सलग सत्तेत राहिला. मात्र, 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पहिल्यांदा कमळ फुलवले. राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावत भाजपने महानगरपालिकेवर ताबा मिळवला. महानगरपालिका ताब्यात आल्यापासून भाजपने पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे. राष्ट्रवादीतून उगम पावलेल्या नेतृत्वाला भाजपने आपल्या बाजूने वळवले आणि स्थानिक पातळीवरही नवे नेतृत्व निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने भाजपला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
आता मात्र दोन्ही राष्ट्रवादी गटांनी आपल्या बालेकिल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसते. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर आणि महानगरपालिकेवर पूर्वीपासून लक्ष ठेवले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी मागील आठवड्यात शहरात जनसंवाद आणि राष्ट्रवादी परिवार संमेलनासारखे कार्यक्रम राबवून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच, काही स्थानिक नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीही ते प्रयत्नशील असल्याचे दिसते. मागील आठवड्यात दोन दिवस पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून अजित पवार यांनी आपली पायमुळे मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही चाचपणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बहुतांश पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी झाल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना यश मिळाले नाही. भोसरीतून निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे यांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. चिंचवडमधून लढलेल्या राहुल कलाटे यांच्या सध्याच्या भूमिकेबाबत स्पष्टता नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याचे दिसते. तरीही, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या तिन्ही उमेदवारांना मिळून साडेचार लाखांहून अधिक मते मिळाली होती, हा त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे.
जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील चुकीच्या गोष्टींवर लक्ष ठेवून स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडावी, तसेच संघटना बळकट करावी, अशा सूचना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आढावा बैठकीत दिल्या आहेत. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सोपवली आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांच्याकडेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी होती. आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यश मिळवून देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Sharad Pawar : Both nationalists are forming a front to take control of the citadel
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar पुणेकरांनी अडवली शरद पवारांची कार! आमची घरं वाचवा अशी केली मागणी
- भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने नेसविली साडी
- Supriya Sule : महाविकास आघाडीत बिघाडी ! सुप्रिया सुळे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढण्याचे संकेत
- भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन




















