विशेष प्रतिनिधी
पुणे : Vandana Chavan : माजी महापौर आणि खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची भेट घेऊन पुण्यातील टेकड्या आणि जैवविविधता उद्यान (बीडीपी) क्षेत्रांच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याची मागणी केली. त्यांनी यासंदर्भात एक पत्र सादर केले, ज्यात राज्य सरकारने टेकड्या आणि बीडीपी संरक्षणासाठी स्थापन केलेल्या माजी आयएएस अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटासमोर महानगरपालिकेने संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे नमूद केले.
चव्हाण यांनी सांगितले की, टेकड्या आणि बीडीपी क्षेत्रे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून, जैवविविधतेचे जतन, पाणी संधारण, भूजल पातळी वाढवणे, पूर प्रतिबंध, शहराचे हवामान नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. पुण्यात आधीच खुल्या जागांची कमतरता असताना टेकड्यांवर बांधकामांना परवानगी देणे म्हणजे शहराच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे आहे.
त्यांनी पत्रात नमूद केले की, विकास आराखड्याच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान ९०,००० हून अधिक पुणेकरांनी टेकड्यांवरील बांधकामांना विरोध दर्शवला होता. याला मुख्य सभेनेही मान्यता दिली होती, ज्यामुळे पुणेकरांची टेकड्या जतन करण्याची दृढ इच्छा स्पष्ट होते. तसेच, काही बेकायदेशीर बांधकामांसाठी महानगरपालिकेची निष्क्रियता जबाबदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. २००५ आणि २०१६ च्या शासन अधिसूचनेनुसार दर सहा महिन्यांनी उपग्रह प्रतिमा घेऊन बेकायदेशीर बांधकामे ओळखणे बंधनकारक असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायदा १९६६ च्या कलम ५६अ अंतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न केल्यास तीन महिने तुरुंगवास किंवा वीस हजार रुपये दंडाची तरतूद आहे, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. बीट अधिकाऱ्यांनीही आपली कर्तव्ये पार पाडली नाहीत.
वंदना चव्हाण यांनी जोरदार शब्दांत सांगितले, “महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा फटका नागरिकांना आणि शहराला बसता कामा नये.”या निवेदन सादर करण्यासाठी पुणे अर्बन सेलचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, नीता गलांडे, सचिन यादव, वृषाली दाभोळकर आणि जयेश मुरकुटे उपस्थित होते.
“The citizens and the city should not be burdened by the inaction of the Municipal Corporation.” Vandana Chavan
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!
 
				 
													



















