उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिला जातो, हे आपल्याला माहीत आहेच. तीन श्रेणींमध्ये या पुरस्काराचं वितरण होत असतं. यात अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो. उच्च कोटीच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण तर प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठीची निवडप्रक्रियाही प्रमाणित केलेली आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीचं नाव अंतिम करायचं असेल, तर त्या व्यक्तीची एकूण कामगिरी, त्याचं चरित्र तपासलं जातं. पद्म पुरस्कार समिती हे काम करते. पंतप्रधान या समितीचं गठन करतात. कॅबिनेट सचिव याचे अध्यक्ष असतात. या समितीनं सुचवलेली नावं राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांना पाठवली जातात. त्यानंतरच अंतिम यादीत त्या व्यक्तीचा समावेश केला जातो.