विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. ४८ तासांत ही त्यांची दुसरी बैठक आहे.
उद्या ( ७ मे ) देशातील विविध राज्यांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक सुरक्षेची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल्स होणार आहेत. १९७१च्या भारत-पाक युद्धानंतर प्रथमच अशा प्रकारचे सराव आयोजित करण्यात येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तसेच तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मागील आठवड्यात त्यांनी डोवालआणि जनरल चौहान यांना सैन्य कारवाईसाठी “कधी, कुठे आणि कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य” दिल्याची माहिती आहे.
पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून ती पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचीच एक शाखा मानली जाते.भारत सरकारकडून पाकिस्तानच्या ‘डीप स्टेट’चा या हल्ल्यामागे हात असल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र पाकिस्तानने या आरोपांचा इन्कार केला असून आंतरराष्ट्रीय चौकशीतून सत्य समोर यावे अशी मागणी केली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यासंदर्भात बंद दरवाजामागे चर्चा झाली. या चर्चेत लष्कर-ए-तोयबाच्या सहभागावर कठोर प्रश्न विचारले गेले. विशेषतः पर्यटक आणि सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्याबाबत पाकिस्तानवर आक्षेप घेण्यात आला.
दरम्यान, पाकिस्तानकडून सलग १२ दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार सुरू असून भारतीय सैन्याने याला प्रतिउत्तर दिले आहे. पाकिस्तानने भारताशी वीजा सेवा आणि १९७२ मधील शिमला करार निलंबित करण्याची घोषणा केली असून, भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला तर तो युद्धसमान पाऊल ठरेल, असा इशाराही दिला आहे.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी आपली हवाई सीमा आणि सीमारेषा बंद केल्या आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले की, “भारताला आपली सार्वभौमता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दहशतवादी धमक्यांचा बदला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.”आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्थिती चिंतेची असली तरी अनेक देश भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रश्न शांततेने सोडवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
त्यामुळेच गेल्या 48 तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची दुसऱ्यांदा झालेली बैठक महत्वाची मानली जात आहे
India-Pakistan tensions rise in wake of Pahalgam attack; National Security Ajit Doval meets PM Modi
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा