Vande Bharat : काश्मीरला वंदे भारतची भेट, आजपासून श्रीनगर-कटरा दरम्यान धावणार रेल्वे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Vande Bharat देशाच्या रेल्वे इतिहासात मैलाचा दगड ठरणारा ‘उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक’ (USBRL) प्रकल्प पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मूतील कटरामधून श्रीनगरकडे धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला आज हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ही गाडी जम्मू-कश्मीरसह संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक घटना ठरणार आहे.Vande Bharat

अर्ध-हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस गाडीची श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानक ते श्रीनगरमधील नवगाम स्थानक यांच्या दरम्यान धावेल. अत्याधुनिक सुविधा असलेल्या या गाडीत स्वयंचलित दरवाजे, अँटी-स्पॉल लेअर्स, हीटिंग सिस्टम, तसेच हिमालयीन हिवाळ्यातही चालू राहण्यासाठी विशेष उष्णता व्यवस्थापन यंत्रणा आहेत. अत्यंत थंड हवामान (-२०°C पर्यंत) सहन करणाऱ्या या गाडीच्या मार्गावर बर्फ हटवणारी विशेष ट्रेन आधी धावेल.

२७२ किमी लांबीचा हा प्रकल्प सुमारे ₹४३,७८० कोटींचा असून जम्मू-कश्मीरच्या कठीण भूप्रदेशातून मार्गक्रमण करतो. या प्रकल्पात ९४३ पूल, ३६ बोगदे (एकूण ११९ किमी) आणि देशातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा T-50 (१२.७ किमी) यांचा समावेश आहे. पिर पंजाल पर्वतरांगांमधील बाणिहाल-काझीगुंड बोगदा देखील याच प्रकल्पाचा भाग आहे.

या रेल्वेमार्गावर दोन अद्वितीय पूल उभारण्यात आले आहेत. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ‘चिनाब ब्रिज’ समुद्रसपाटीपासून ३५९ मीटर उंचीवर आहे, तसेच भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वे पूल ‘अंजी खड्डी ब्रिज’, जो ३३१ मीटर उंचीवर आहे आणि ९६ केबल्सद्वारे आधारलेला आहे.

हा रेल्वे मार्ग जम्मू-कश्मीरला खऱ्या अर्थाने भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा आहे. व्यापारी, पर्यटन, लष्करी आणि नागरी दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग फलदायी ठरणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सीमावर्ती भागांपर्यंत रेल्वे पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.

Vande Bharat visit to Kashmir, train will run between Srinagar-Katra from today

महत्वाच्या बातम्या