डरपाेक, बेईमान…बंडखाेर खासदारांना संजय राऊत यांचे शिव्याशाप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा उभी फुट पडणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर वैफल्यग्रस्त झालेल्या खासदार संजय राऊत यांनी बंडखाेर खासदारांना शिव्याशाप द्यायला सुरूवात केली आहे. सगळ्यांचा हिशाेब करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी १४ जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, आमची १४ तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसऱ्याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही. हे सर्व खासदार ‘मशाल’ चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही. “ज्यांना आता जायचे असेल त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग जावे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, काल रात्री ११ वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी ५० कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली.पक्षाने सर्व खासदारांसाठी अधिकृत ‘व्हीप’ जारी केला असून, दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने तातडीने अधिकृत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. वर्धापन दिनापूर्वी सुरू असलेल्या या हायव्होल्टेज राजकीय नाटकामुळे महाराष्ट्राचे राजकारण आता टोकाला पोहोचले आहे.

लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ६ खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश सदस्य वेगळे झाले तर स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकते. त्यामुळे ९ पैकी किमान ६ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास या गटाला कायदेशीर वैधता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार बंडू जाधव धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील या खासदारांनी स्वतंत्र गटासाठी सहमती दर्शवली आहे.

 Sanjay Raut Slams Rebel MPs in Fiery Attack

 

महत्वाच्या बातम्या