विशेष प्रतिनिधी
धुळे: वादग्रस्त वक्तव्य तसेच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळत असलेला व्हिडीओ समोर आल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विरोधकांनी घेरले आहे. धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला. Manikrao Kokate
कोकाटे यांचा आज धुळे जिल्हा दौरा असल्याने धुळे शहरातील टॉपलाईन या हॉटेलवर मुक्कामाला थांबलेले आहेत. शेतकऱ्यांनो शेती सोडा, रमी खेळा ह.भ.प. माणिक कोकाटे, शेतकऱ्यांनो रमी खेळा, लाखो जिंका, ऑनलाईन रमी, अशा आशयाचे बॅनर्स दाखवत ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेल टॉपलाईन बाहेर काळे झेंडे दाखवत माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला गेला. , टॉपलाईन बाहेर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचल्याने विकत आणलेले सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही. त्यामुळे पडून असलेले सोयाबीनचे बियाणे विकून त्यातून मिळालेले 5550 रुपये त्याने थेट राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्य नाावाने मनीऑर्डर केले आहेत. या तरुण शेतकऱ्याने ही मनीऑर्डर कृषिमंत्री कार्यालय, मुंबईच्या पत्त्यावर केली आहे व सोबत हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा, अशी विनंती देखील या शेतकऱ्याने केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेत. मी यापूर्वीच त्यांना इजा झाले बिजा झाले आता तिजा होऊ देऊ नका याची जाणिव करून दिली होती. आता ते या प्रकरणी आपण ते खेळत नसल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांच्याशी सोमवारी समोरासमोर चर्चा करेन. त्यानंतर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईन, असे ते म्हणाले.