विशेष प्रतिनिधी
नागपूर : पैशाची उधळपट्टी, तिजोरीची लुट आणि वाढवलेली टक्केवारी यामुळे राज्य सरकार भिकारी आणि कंगाल झाले आहे. माणिकराव कोकाटे जे बोलले ते खरं आहे सरकार भिकारी झाले आहे. गेल्या 3-4 वर्षांमध्ये भिकारी आणि कंगाल करण्याचे पाप महायुती सरकारचे आहे, असा आरोप काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, कोणतेही काम करायचे असेल तर किमान 20 टक्के द्यावे लागतात , त्याशिवाय काम होतच नाही. जुलै महिना संपत आला असून डीपीडीसीचे पैसे मिळालेले नाही. 5 महिन्यांपासून निराधार लोकांना पैसे दिले गेले नाही. राज्यात रोज 7 शेतकरी विविध कारणाने आत्महत्या करतात. आता ही परिस्थिती कंत्राटदारांच्या आत्महत्येपर्यंत आली आहे. आता जर कंत्राटदारांचे आत्महत्या सुरू झाल्या तर राज्यात नावालाही कंत्राटदार शिल्लक राहणार नाही. 88 हजार कोटीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे देणं बाकी आहे.
हर घर नल देणार म्हणणाऱ्यांकडे पाणी देण्यासाठी पैसे नाही. लाज विकून खाल्लेले सरकार महाराष्ट्रात आले आहे. एकीकडे कंत्राटदार आत्महत्या करत आहे आणि दुसरीकडे पैशाचा बँगा भरलेल्या आहेत, चड्डी बनियन गँग, टावेल बनियन गँग महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. ह्या महाराष्ट्राला लुटण्यासाठी तयार झाल्या आहेत. हे डाकू, दरोडेखोर यांना लाजवतील, अशी टीका त्यांनी केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जर 4 मंत्र्यांवर कारवाई करायला गेले तर उद्या 14 चे फोटो समोर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री जपून कारवाई करत आहे. आमच्याकडे काही फोटो, सीडी आहे. गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने असणाऱ्या बारमध्ये 25 बारबाला नाचवल्या जात आहे, किमान मंत्री असेपर्यंत तरी बार बंद करायचा ना? त्यांच्या बार वर जर धाड पडत असेल तर हे तलवारी हातात न घेता सुरू असलेले युद्ध आहे. महायुतीमधील घटक पक्षातील अनेकांच्या मनात राग आहे. नाना पटोले यांनी पेन ड्राईव्ह का दिले नाही याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. पण त्यांची भूमिका शंकास्पद नाही. पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पेन ड्राईव्ह द्यावा असे आज भेट झाल्यावर त्यांना सांगू.
Vijay Wadettiwar alleges that the state government has become a beggar and pauper due to extravagance, looting of treasury and increased percentage.