विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. जवळपास 18 तास त्यांच्या विविध ठिकाणांवर चौकशी करण्यात आली. यामध्ये मोठे घबाड सापडल्याची शक्यता आहे. पवार हे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच त्यांना बढती दिली होती. Dada Bhuse
वसई विरार महापालिकेच्या हद्दीत डम्पिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या 41 बेकायदा इमारतींप्रकरणी अनिलकुमार पवार यांच्यावर हा छापा पडला आहे. अनिलकुमार पवार यांची सोमवारी वसई विरार आयुक्त पदावरुन बदली झाली, त्यांना निरोपसमारंभ देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी ही कारवाई झाली आहे. अनिलकुमार पवार हे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले की, अनिलकुमार पवार हे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत. त्यांना आयएएस दर्जा मिळण्यापूर्वीच दादा भुसे यांच्या सांगण्यावरुन तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तपदी बढती दिली होती. अनिल पवार हे यापूर्वी ठाण्यात अपर जिल्हाधिकारी पदावर होते. तिथून त्यांची नाशिकला बदली झाली. तिथून ते पुन्हा ठाण्यात मुद्रांक शुल्क विभागात आले. त्यानंतर 13 जानेवारी 2022 रोजी त्यांची थेट वसई विरार महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तपदी बदली झाल्यानंतर 29 जून 2023 रोजी ते आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले.
अनिलकुमार पवार यांच्या आयुक्तपदाच्या काळात वसई विरार महापालिकेतील सांडपाणी प्रक्रिया आणि डंम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या 60 एकर जमिनीवर 41 इमारतींचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाले असल्याचा आरोप असून या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने वसई-विरार महानगरपालिकेचे (VVMC) माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्या संबंधीत ठिकाणांवर छापेमारी केली.