विशेष प्रतिनिधी
पुणे : Andekar gang : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी (दि.५) सायंकाळी नाना पेठेत बेछूट गोळीबार करून खून करण्यात आला. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू अण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केली.
गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा, गोळीबार तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. आंदेकर आणि कोमकर कुटुंबीयातील मालमत्तेचा वाद आणि टोळीयुद्धातील संघर्षातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष याचा लहान भाऊ कॅम्प परिसरात खासगी क्लासेससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष सात वाजताच्या सुमारास गेला. तेथून दोघे दुचाकीवरून परत आले. त्यावेळी सायंकाळचे साडे सात वाजले होते. फिर्यादी कल्याणी कोमकर या घरी होत्या. त्यांना बिल्डिंगमधील दोघांनी फोन करून सांगितले की, तुमचा मोठा मुलगा आयुष याला कोणीतरी मारहाण केली आहे. कल्याणी यांनी धावत जाऊन खाली पाहिले. तेव्हा त्यांचा आयुष रक्तबंबाळ अवस्थेत पार्किंगमध्ये जमीनीवर पडलेला दिसला. त्यांचा लहान मुलगा रडत होता. कल्याणी यांनी आयुषला कोणी मारले असे विचारले. त्यावेळी त्याने सांगितले की, दादा (आयुष) आणि मी क्लास सुटल्यानंतर दुचाकीवरून पार्किंगमध्ये आलो. मी गाडीच्या खाली उतरलो, दादाने गाडी पार्क केली. तेवढ्यात आमच्या पाठीमागून दोन मुले पाठीमागून पळत आली. त्यांनी समोरून दादावर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. त्यावेळी तो खाली पडला. कल्याणी यांनी बिल्डिंगमधील एका डॉक्टरांना बोलाविले. त्यांनी आयुषला उपचारासाठी ससून येथे घेऊन जाण्यास सांगितले. काही वेळात पोलीस तेथे दाखल झाले. ससूनमधील डॉक्टारांनी तपासून आयुषचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून पाळत
वनराज आंदेकर याच्या खूनाच्या संशयावरून माझे पती गणेश, दीर प्रकाश आणि जाऊ संजीवनी हे जेलमध्ये आहेत. वनराज याचा खून झाल्यापासून आंदेकर टोळीतील लोकं बदला घेण्यासाठी आमच्यावर पाळत ठेवून असतात असे देखील कल्याणी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी कल्याणी यांना दाखविले असता, त्यांनी अमन पठाण आणि यश पाटील या दोघांना ओळखले असून, ही मुले बंडू आंदेकर टोळीसाठी काम करीत असल्याचे म्हटले आहे. कल्याणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अकरा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते म्हणाले, आयुष कोमकर खून प्रकरणी, दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तर इतर फरार आरोपींचा देखील पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी, अकरा जणांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Murder of a youth in Nana Peth due to gang war, crime against eleven people including Andekar gang leader Bandu Andekar
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा