विशेष प्रतिनिधी
मुंबई : Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात साेमवारी झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील अनेक मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली.
आचार्य देवव्रत यांचा प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडून राज्यपालपदाची जबाबदारी समर्थपणे पार पडेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. शपथविधीनंतर देवव्रत यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे म्हटले आहे. यानंतर राज्यपाल भवनात अधिकृत सत्काराचा कार्यक्रमही पार पडला.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे रविवारीच मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपालांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली तर राजभवन येथे पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.
आचार्य देवव्रत जुलै 2019 पासून गुजरातच्या राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना महाराष्ट्राची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. आता ते दोन्ही राज्यांच्या कारभारावर लक्ष केंद्रित करतील आणि राज्यपाल म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील.
Acharya Devvrat is the new Governor of Maharashtra.
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा