विशेष प्रतिनिधी
पुणे: Murlidhar Mohol : बूथ स्तरापासून कामाला सुरुवात करून युवा मोर्चा, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महानगरपालिकेचे महापौर, प्रदेश महामंत्री, खासदार आणि आता केंद्रीय सहकार राज्यमंत्री असा सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या पुण्याच्या खासदाराला आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने गिरीश बापट हे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी होते. आमदार मुक्ता टिळक आणि मेधा कुलकर्णी या ब्राह्मण समाजातील प्रतिनिधी होत्या. परंतु, मुक्ता टिळक आणि गिरीश बापट यांच्या निधनामुळे तसेच मेधा कुलकर्णी यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राह्मण प्रतिनिधींना डावलले जात असल्याची चर्चा होत होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुणे जिल्ह्यातून भाजप कोणाला उमेदवारी देईल, यावर बरीच चर्चा झाली. अनेक उमेदवार इच्छुक असताना भाजपने पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास दाखवला. या विश्वासाला सार्थ ठरवत मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धांगेकर यांचा दणदणीत पराभव करून विजय मिळवला. पहिल्याच निवडणुकीत खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय सहकार राज्यमंत्रीपद देण्यात आले. आणि आता मुरलीधर मोहोळ यांना पक्षाकडून एक मोठी संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे.
पुढील वर्षी एप्रिलमध्ये तमिळनाडू विधानसभेची मुदत संपणार आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगाल, बिहार आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपचे सचिव अरुण सिंह यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तमिळनाडूच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर आता मोहोळ यांना पक्षाकडून ही मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळाली आहे.
पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही नवी जबाबदारीही तितक्याच निष्ठेने निभावणार आहे. माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळणे, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या नियुक्तीनंतर दिली.
Murlidhar Mohol progress graph is steadily climbing…
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!