विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी, मराठी भाषिक वादामुळे लोकलमध्ये झालेल्या मारहाणीमुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. भाजपने आता या मुद्यावरून मराठीचा आग्रह धरणाऱ्या ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. अर्णव खैरेच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही, असा हल्लाबोल केला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, मराठी माणसाने ठाकरे बंधूंना भरभरून प्रेम दिले. सत्ता दिली, सन्मान दिला… पण परत काय मिळाले? भकास मुंबई, आणि त्यांच्या स्वार्थी भावनिक राजकारणापायी निर्माण झालेला द्वेष. अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही. भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवले त्यातूनच हा मृत्यू घडला आहे. ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही!
. मुंबईचा महापौर हिंदु होणार असा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. हिंदुत्वाची ॲलर्जी असलेल्या तमाम लांगूलचानवाद्यांच्या पोटात मळमळ सुटली. हिंदू, मराठी असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न मविआ कडून सुरू झाला.मराठी माणूस हिंदू नाही? मराठी माणसाला हिंदुत्वाबद्दल आस्था नाही? काँग्रेसला तर हिंदुत्वाचं वावडंच आहे, पण उद्धव ठाकरेंनाही शेलार यांचा विचार झोंबला? मुंबईचा महापौर हिंदू हवा की नको हे उध्दव ठाकरे यांनी जाहिर करायलाच हवे! मुंबईकर जनतेची भावना शेलार यांनी बोलून दाखवली आहे, असे उपाध्ये म्हणाले.
अर्णव खैरे हा कल्याण पूर्व येथील सहजीवन रेसिडेन्सीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो मुलुंड येथील केळकर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. तो नेहमीप्रमाणे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी कल्याणहून कॉलेजला जाण्यासाठी लोकलने निघाला. ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. या गर्दीत थोडी जागा मिळावी म्हणून त्याने हिंदीत केवळ ‘थोडा आगे हो’ एवढेच शब्द उच्चारले होते. त्याचवेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या 4-5 तरुणांनी त्याला वेढले व तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का? असे प्रश्न करत मारहाण केली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अर्णव घाबरला. ठाणे स्टेशनला पोहोचताच तो लोकलमधून उतरला व पुढील लोकल पकडून मुलुंड स्थित आपल्या कॉलेजला पोहोचला. त्याने त्या दिवशी प्रॅक्टिकलला उपस्थिती लावली. पण मनातल्या भीतीमुळे व तणावामुळे तो कॉलेज अर्धवट सोडून घरी परतला. घरी जाताना त्याने वडिलांना फोन करून लोकलमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तो मानसिकदृष्ट्या खूपच खचल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास त्याचे वडील घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.
त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता अर्णवने आपल्या बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने त्याला रुख्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी रात्री 9.05 वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर वडील जितेंद्र खैरे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी वडिलांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
Thackeray brothers will not be able to escape the sin of Arnav Khaire’s death, BJP attacks them on linguistic hatred
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश




















