महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाला अधिक सक्षम आणि हायटेक करण्यासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची विशेष आधुनिकीकरण योजना मंजूर केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा अधिक बळकट होणार असून पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. Maharashtra Police

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार, तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल. महाराष्ट्र पोलीस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.



केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीचा वापर प्रामुख्याने वाढते सायबर गुन्हे कमी करण्यासाठी केला जाईल. राज्यातील सायबर सेल्स अपग्रेड करून तपास प्रक्रियेत एआय आणि प्रगत सॉफ्टवेअरचा वापर वाढवला जाईल. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आधुनिक गस्ती नौका आणि टेहळणी यंत्रणा पुरवली जाईल. याशिवाय तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकांना विशेष तांत्रिक बळ दिले जाईल.

या निधीतून पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान वाहने आणि दळणवळणाची प्रगत साधने दिली जातील. तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठीही विशेष तांत्रिक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या आधुनिकीकरणामुळे आता महाराष्ट्र पोलीस दल भविष्यातील गुन्हेगारी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे.

Maharashtra Police Set for Technology Upgrade as Centre Approves Modernisation Plan

महत्वाच्या बातम्या