Contractors : खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न केल्याप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हे

विशेष प्रतिनिधी

पुणे : Contractors  सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी रस्ते खोदून काम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ववत न केल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा ठपका ठेवत वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या कामातील दोन ठेकेदार कंपन्यांच्या प्रतिनिधींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित कंपन्यांच्या एका अभियंत्यासह एका पर्यवेक्षकाविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.Contractors

महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांवर जलवाहिन्या, जलनिस्सारण वाहिन्या तसेच अन्य सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांना सशुल्क खोदकामाची परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून साधारणपणे १ ऑक्टोबर ते ३० एप्रिल या कालावधीत खोदकामास परवानगी दिली जाते. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी, ३१ मेपर्यंत संबंधित रस्ते पूर्ववत करणे संबंधित संस्था अथवा ठेकेदारांवर बंधनकारक असते.Contractors



महापालिकेच्या विविध कामांसाठीही ठेकेदार कंपन्यांकडून खोदकाम करण्यात येते. मात्र, अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जात नसल्याने पावसाळ्यात वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांची गैरसोय वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.

यंदाही महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी सर्व खोदकामे पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. पावसाळा उशिरा सुरू होऊनही अनेक ठिकाणी खोदकाम केलेले रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नसल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

उंड्री येथील होले वस्ती चौकात करण्यात आलेल्या खोदकामानंतर ६ मेपासून संबंधित ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने तेथे दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अभियंत्याविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे.

याच परिसरात वाहतूक पोलिसांची आवश्यक परवानगी न घेता ड्रेनेज वाहिनीचे काम करून रस्ता पूर्ववत न केल्याप्रकरणी दुसऱ्या एका ठेकेदार कंपनीच्या पर्यवेक्षकाविरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन कारवाईची मोहीम सुरू करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

Contractors Booked for Failing to Restore Roads After Excavation

महत्वाच्या बातम्या