लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं मारली रेल्वेमधून उडी; कारण अस्पष्ट

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी :- रत्नागिरी ( ratnagiri news )जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यासह मुसळधार पावसात बाहेर उडी घेतल्याचा थरार घडला आहे. खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली.



या दुर्घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर या महिलेचा रेल्वे ट्रॅकवर कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा लहान मुलगा हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. मुसळधार पाऊस आणि वेगाने धावणारी रेल्वे असल्याने उडी मारल्यानंतर तिघेही लोहमार्गाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.मेटे गावाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर तातडीने खेड पोलीस आणि रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली .

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी घोषित केले. सध्या शुभ्रा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर गंभीर जखमी झालेल्या सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत.

चालत्या ट्रेनमधून, त्यातही दीड वर्षाच्या चिमुकल्याला सोबत घेऊन असा टोकाचा निर्णय या जोडप्याने का घेतला? याचे उत्तर अद्याप गूढ आहे. त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक वाद होता का? आर्थिक अडचणी होत्या की काही मानसिक ताण होता? या सर्व बाजूंचा तपास पोलीस करत आहेत . धावत्या एक्सप्रेसमधून उडी मारण्यापूर्वी ट्रेनमध्ये त्यांचे काही भांडण झाले होते का, यादृष्टीने सहप्रवाशांचेही जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

खेड पोलिसांकडून सखोल तपास सुरू

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्राथमिक माहिती आणि उपलब्ध परिस्थितीवरून हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमागील नेमके आणि मूळ कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी खेड पोलीस आता तांत्रिक पुराव्यांच्या आणि नातेवाईकांच्या चौकशीच्या आधारे सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Live-in couple jumps from moving train; reason unclear.

महत्वाच्या बातम्या