विशेष प्रतिनिधी
पुणे: लोहगडावर व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या गाजत असलेल्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यानंतर आता या कटाची पूर्वकल्पना असलेल्या तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाला या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती, असे तपासात समोर आले असून, त्याला ‘माफीचा साक्षीदार’ (Approver) बनविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Ketan Agrawal
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. तो मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र आणि जवळचा मित्र असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दोघांमध्ये सातत्याने संपर्क होता.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतन अग्रवालला वाटेतून कसे दूर करायचे, याचा संपूर्ण कट या तरुणासमोर उघड केला होता. १८ जून रोजी लोहगडावर सोबत येण्याचा आग्रहही त्यांनी त्याच्याकडे धरला होता. मात्र, त्याने त्यास स्पष्ट नकार देत, “असे काही करू नका,” असा सल्ला दोघांनाही दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच मित्राला भेटला होता. त्यानंतर सिया गोयलनेही त्याच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तिघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन, डिजिटल चॅट्स तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सखोल पडताळणी केली जात आहे.
तपास यंत्रणांच्या मते, या तरुणाच्या जबाबातून हत्येच्या कटाचे नियोजन, घटनाक्रम आणि आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला सरकारी साक्षीदार अर्थात ‘माफीचा साक्षीदार’ करण्याबाबतही कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि आरोपींच्या हालचालींची पडताळणी सुरू असून, या नव्या घडामोडीमुळे तपासाला महत्त्वाचे वळण मिळाल्याचे मानले जात आहे.
Third Person Detained in Ketan Agrawal Murder Case, May Turn Approver
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी