मुसळधार पावसाने सिंहगड, वरंधा घाटात दरडी कोसळल्या, सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी सिंहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठी दरड कोसळल्याने वन विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ला तात्पुरता बंद केला आहे. त्याचवेळी भोर तालुक्यातील वरंधा घाटातही मोठी दरड कोसळल्याने भोर, महाड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. Sinhagad Fort

सिंहगड परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर पहाटे मुख्य प्रवेशमार्गालगतचा कडा खचला. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वन विभागाने तातडीने किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सतत सुरू असलेल्या पावसामुळे माती सैल झाली असून पुढील काही तासांत आणखी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत पर्यटकांनी सिंहगडावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



दरम्यान, भोर तालुक्यातील शिरगाव हद्दीतील वरंधा घाटातही मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. माती, दगड, झाडे आणि झुडपे रस्त्यावर आल्याने भोर, महाड मार्ग पूर्णपणे बंद झाला. सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन त्या मार्गावर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, दरड हटविल्यानंतर तज्ज्ञांकडून रस्त्याची पाहणी केली जाईल. त्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि घाटमार्गांवर वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घाट रस्त्यांवर प्रवास टाळण्याचे, तसेच पर्यटनस्थळी जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

Heavy Rains Trigger Landslides at Sinhagad and Varandha Ghat; Sinhagad Fort Closed to Tourists

महत्वाच्या बातम्या