काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी, दहा काेटी रुपयांची मागितली खंडणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकीचे फोन येत असल्याचा धक्कादायक प्रकार विधानसभा सभागृहात उपस्थित झाला. सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार पठाण यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी काॅंग्रेसने केली. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना 25 गार्ड देण्यात आले.अशीच सुरक्षा काँग्रेसच्या आमदारांना देण्यात यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असल्याचे स्पष्ट करत, धोका लक्षात घेऊन आवश्यक ते संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले. Sajid Pathan

कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून राज्यातील आमदारांना फोनवरून थेट धमक्या दिल्या जात असून, यामध्ये विशेषतः आमदार साजिद खान पठाण यांनाही धमकी आल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी सभागृहात केला.
विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.



वडेट्टीवार म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता साजिद पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉल आला. स्वतःला शुभम लोणकर असे सांगणाऱ्या व्यक्तीने आपण बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितले आणि १० कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली.त्यांनी पुढे सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली तरी महिनाभर-दोन महिने संरक्षण मिळेल; मात्र, सहा महिने किंवा वर्षभरानंतर ठार मारू, अशी उघड धमकी दिली. लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला तत्काळ पावले उचलण्याचे व आमदारांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मात्र, सभागृहात साजिद पठाण यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही.

आमदारांच्या सुरक्षेचा हा अत्यंत संवेदनशील प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, सत्ताधाऱ्यांच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. आमदारांना बिश्नोई गँगकडून येणाऱ्या या धमक्यांची राज्य सरकारकडून सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिले आहे.

Congress MLA Sajid Pathan Receives Bishnoi Gang Death Threat, ₹10 Crore Extortion Demand

महत्वाच्या बातम्या