लाईनमन म्हणून हिणवू नका; ओमराजेंची कार्यकर्त्यासोबत बाचाबाची, ऑडिओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी

धाराशिव :- ओमराजे निंबाळकर Omraje nimbalkar आणि त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.एका डीपी बसवण्याच्या कामवरून आणि स्थानिक राजकारणाच्या नियोजनावरून या दोघांमध्ये फोनवर जोरदार वाद झाल्याचे या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार्यकर्त्याने खासदार निंबाळकर यांना फोन करून विकासकामांच्या संथ गतीबद्दल आणि नियोजनाबद्दल जाब विचारला.”५० डीपी आणण्यासाठी जर एवढ्या चकरा माराव्या लागत असतील, तर इतर मोठे मुद्दे मागेच राहतील. आपण सत्तेत नेमके कशासाठी गेलो?” असा थेट सवाल कार्यकर्त्याने खासदारांना केला आहे . तसेच, मतदारसंघाबाहेरील मित्र आपल्याला ‘तुम्ही खासदार निवडलाय की लाईनमन?’ असे विचारून हिणवत असल्याचेही या कार्यकर्त्याने सांगितले.



“मला लाईनमन म्हणून हिणवू नका”

कार्यकर्त्याच्या या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर संतापले असं क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे. ते म्हणाले, “मी तुमचे काम केले आहे, पण त्यासाठी मला ‘लाईनमन’ म्हणून हिणवू नका. एखाद्या माणसाने मनापासून मदत केली, तर त्याला असे बोलणे योग्य नाही. मी काम केले म्हणून जर तुम्ही मला हिणवणार असाल, तर तो माझ्या कामाचा आणि जनतेच्या मतांचा अपमान आहे.”या संभाषणादरम्यान दोघांमध्ये विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पराभवावरूनही जुनी धुसफूस चव्हाट्यावर आली. या ऑडिओ क्लिपमुळे धाराशिवसह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

“Don’t call me a lineman”; Omraje gets into a heated exchange with a party worker; audio goes viral.

महत्वाच्या बातम्या