खासदार, आमदार पळवण्याची सवय दानाच्या पळवापळवीचेही काही वाटेना, भाजपच्या नेतृत्वावर राज ठाकरे यांचा हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार पळवण्याची इतकी सवय झाली आहे की, देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचेही या नेत्यांना काही वाटेनासे झाले आहे. प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन सत्तेवर बसलेल्यांना या अपहाराविषयी काहीच कसे वाटत नाही?” असा हल्लाबाेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. Raj Thackeray

अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानामध्ये (देणगी आणि दागिने) झालेल्या कोट्यवधींच्या अपहारावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. साेशल मीडियावरील पाेस्टमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विषयावरील मौनावर तीव्र आक्षेप नोंदवला. “रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी पंतप्रधानांनी गाभाऱ्यात एकट्याने पूजा केली. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल, तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची आणि लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे.



2024 च्या निवडणुकीत अयोध्येत भाजपने मारलेली धडक आणि तिथे मिळालेला नकार, यामुळेच रामाला पुन्हा वनवासात ढकलले जात आहे का, असा सवाल करत राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षांना खीळ घालण्यासाठी त्यांच्याच पक्षातील विरोधक हा मुद्दा नक्की उचलतील आणि त्यांची कोंडी करतील. अमित शहा सध्या विरोधी पक्षांची घरे कशी फोडता येतील आणि आपण पंतप्रधानपदाच्या खुर्चीत कसे बसू, याची धुरकट स्वप्ने पाहत आहेत. त्यामुळे रामाच्या घरात काय घडतंय, याला त्यांच्या लेखी काही किंमत नाही.

भक्तांच्या भावनांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, अयोध्येचे मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंचे, साधू-संतांचे आणि प्राण गमावलेल्या करसेवकांचे आहे. महिलांनी दिलेले स्त्रीधन आणि घामाच्या पैशातून दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्या खिशात जात आहे. मूर्तीमध्ये प्राण फुंकले जातात असे म्हणतात, मग मूर्तीच्या हातातील शस्त्रांनी या नराधमांचा बंदोबस्त का केला नाही? की मूर्तीत दगडच फुंकला आहे?”देवी-देवतांची पूजा करा, पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्यांची पूजा करू नका व कोणतेही दान यांच्या पदरात टाकू नका.

अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि धनादेश दानपेटीत (हुंडीत) जमा केले जातात. मात्र, नुकतेच या देणगीच्या मोजणीत आणि नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या दानपेट्यांची मोजणी आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी आणि संबंधितांनी संगनमत करून हा निधी हडपल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत काही आरोपींना अटकही केली आहे.

Used to Poaching MPs and MLAs, BJP Leadership Now Unfazed by Donation Controversy: Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या