“उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष वाचवावा”, बावनकुळेंचा पलटवार; शिंदेंचीच खरी शिवसेना असल्याचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: यवतमाळ येथील सभेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची अवस्था पाहावी, असा टोला बावनकुळेंनी लगावला.

बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे. अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना सोडून इतर पक्षात जात आहेत. त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे.”



भाजपवर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “भाजपने नेहमीच हिंदुत्व, राष्ट्रहित आणि राष्ट्रीय अस्मिता मजबूत करण्यासाठी काम केले आहे. आमचा पक्ष विचारांच्या आधारावर पुढे जात आहे. मात्र, उद्धव ठाकरेंकडे आता बोलण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नसल्याने ते सभांमधून केवळ मनातील नाराजी व्यक्त करत आहेत.”

शिवसेनेच्या वारशावरूनही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि त्यांची खरी शिवसेना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सातत्याने महायुतीवर टीका करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रातील फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत असून विविध सभांमधून भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.

‘Save Your Own Party First’: BJP’s Bawankule Hits Back at Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या