MLA Rajesh Kshirsagar : कथित ४० लाखांच्या कमिशन व्हिडिओने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ; आमदार राजेश क्षीरसागरांवर गंभीर आरोप, उद्या पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : MLA Rajesh Kshirsagar शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिंदे गटाचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर विकासकामांच्या कंत्राटांमध्ये कथित कमिशनखोरीचे गंभीर आरोप करत एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे.MLA Rajesh Kshirsagar

इंगवले यांनी प्रसिद्ध केलेला कथित व्हिडिओ हा कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील एका ठिकाणी चित्रित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून त्यावर २५ ऑक्टोबर २०२५ ही तारीख दिसत आहे. या व्हिडिओतील संभाषणात शासकीय विकासकामांच्या टेंडरसाठी एकूण ७ टक्के कमिशन निश्चित करण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी ५ टक्के हिस्सा आमदार राजेश क्षीरसागर, तर उर्वरित प्रत्येकी १ टक्का हिस्सा राहुल आणि प्रशांत नावाच्या दोन व्यक्तींना देण्याचे ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.MLA Rajesh Kshirsagar



व्हिडिओतील संभाषणानुसार, ५ टक्क्यांच्या हिशोबाने आमदार क्षीरसागर यांच्यासाठी ४० लाख रुपये देण्यात आल्याचा उल्लेख आहे. तसेच ‘राहुल’ नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आल्याचेही संभाषणात ऐकू येते. मात्र, अंतिम टप्प्यात व्यवहारात मतभेद झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने व्यवहार मान्य करण्यास नकार दिल्याचेही या कथित व्हिडिओत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हिडिओचा हवाला देत रविकिरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली. “विकासकामांमध्ये ठरलेली टक्केवारी मिळाली नाही तर कंत्राटदारांवर दबाव टाकण्याची आणि दमदाटी करण्याची पद्धत या व्हिडिओमधून समोर येते. हा जनतेच्या पैशांवरील डल्ला असून या प्रकरणी आम्ही पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

या कथित व्हिडिओनंतर विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या कथित आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “४० लाख रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत जनतेसमोर सत्य येणे आवश्यक आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी या प्रकरणावर कोणतीही दिशाभूल न करता तातडीने खुलासा करावा,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही सरकारवर निशाणा साधला. “भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींवर असे आरोप होणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” अशी टीका त्यांनी केली.

दुसरीकडे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कथित व्हिडिओवर तत्काळ प्रतिक्रिया देणे टाळले आहे. “या संपूर्ण प्रकरणावर मी सविस्तर भूमिका उद्या आयोजित पत्रकार परिषदेत मांडणार आहे. त्या वेळी या व्हिडिओमागील सत्य आणि माझी बाजू जनतेसमोर मांडेन,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या कथित व्हिडिओची स्वतंत्रपणे अधिकृत पडताळणी झालेली नाही. तसेच या व्हिडिओतील दावे किंवा संभाषणाची सत्यता अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेने प्रमाणित केलेली नसून, या प्रकरणात संबंधित पक्षांची भूमिका आणि संभाव्य चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

Alleged Rs 40 lakh commission video rocks Kolhapur politics; MLA Rajesh Kshirsagar faces serious allegations, to break silence today

महत्वाच्या बातम्या