सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य

विशेष प्रतिनिधी

पुणे : लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. चांगल्या घरच्या आणि सुशिक्षित मुलांमध्ये अशी सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होते, याचा केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक अँगलनेही तपास झाला पाहिजे, अशी गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. Ketan Agarwal case

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून निर्घृण हत्या केली होती. पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्याच्याच नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भिमराव कांबळे या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले, विशेष न्यायालयाने या नराधमाला आधीच दोषी ठरवले असून, २९ जून रोजी त्याची शिक्षा सुनावली जाणार आहे. “हे अत्यंत दुर्मिळ आणि क्रूर प्रकरण असून, आम्ही न्यायालयाने या हैवानाला थेट मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे, न्यायालय ती मान्य करेल अशी पूर्ण अपेक्षा आहे.



नसरापूर प्रकरणाचा पुणे ग्रामीण पाेलीसांनी प्राेफेशनल पध्दतीने तपास केला याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काैतुक केले. न्यायालयाने खटला जलदगती चालविताना सुट्ट्याही घेतल्या नाहीत. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाचे आभार मानले.

१ मे २०२६ रोजी नसरापूरमध्ये घडलेल्या या पाशवी घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी अवघ्या १५ दिवसांत तपास पूर्ण करत १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष म्हणजे, न्यायालयाने सुट्टीच्या दिवसांतही काम करून केवळ दोन महिन्यांत हा खटला निकाली काढला आहे. राज्यातील हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान ऐतिहासिक खटला ठरला असून, अशा जलद निकालांमुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Why are educated youth becoming so vengeful? Chief Minister comments on Ketan Agarwal case

महत्वाच्या बातम्या