हा दौरा नाही, निष्ठावंतांना निवडून देण्याची मोहीम’; बंडखोर खासदारांवर अरविंद सावंतांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : शिवसेना (ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. हा केवळ दौरा नसून निष्ठावंतांना निवडून देण्याची आणि महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्याची मोहीम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सावंत म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंवरील विश्वासामुळे खासदारांना निवडून दिले. मात्र, निवडून आल्यानंतर काही खासदारांनी मतदारांचा आणि जनादेशाचा अवमान करत पक्षांतर केले. उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रचार केला, शिवसैनिकांनी जीव तोडून मेहनत घेतली, पण काही लोकांनी जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला.



बंडखोर खासदारांवर टीका करताना सावंत म्हणाले की, “गद्दार हा शब्दही आता बोथट झाला आहे. हे विकले जाणारे लोक आहेत. जनतेने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.”

ते पुढे म्हणाले की, मतदारांनी मशाल चिन्हावरील विश्वासामुळे मतदान केले होते. मात्र, जनतेला न विचारता पक्ष बदलणे हा जनादेशाचा अपमान आहे. खासदारांना मिळालेल्या विकास निधीचा किती वापर झाला, याची माहिती माध्यमांनी समोर आणल्याबद्दल त्यांनी माध्यमांचे आभारही मानले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही त्यांनी टीका केली. भाजपने देशभरात पक्षांतराचे राजकारण सुरू केले असून विकाऊ राजकारणामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे शनिवारपासून तीन दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. हा दौरा नसून महाराष्ट्रात निष्ठावंत नेतृत्वाला बळ देण्यासाठीची जनजागृती मोहीम असल्याचे सावंत यांनी सांगितले.

This is not a tour, but a campaign to elect loyalists: Arvind Sawant targets rebel MPs

महत्वाच्या बातम्या