विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि भरती प्रक्रियेवर जोरदार हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांचे थकीत पैसे, ऑनलाइन परीक्षांतील गोंधळ, अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, संगणक परिचालक भरती आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, नागपूर अधिवेशनात सरकारने अनेक घोषणा केल्या, मात्र आजही धान, हरभरा, कापूस आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळालेले नाहीत. काही ठिकाणी बनावट खरेदी दाखवून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांना थकीत रक्कम व्याजासह द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 5 जुलैला येणाऱ्या सुधारित पीक कर्जमाफीच्या शासन निर्णयातून सर्व त्रुटी दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर टीका करताना कडू म्हणाले की, विधानसभेत अनेक अधिकारी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. काही मोजके प्रामाणिक अधिकारी वगळता बहुतांश अधिकारी केवळ कमाई करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. सभागृहात घेतलेले निर्णय गावपातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचले पाहिजेत, तरच लोकशाहीला अर्थ प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.
ऑनलाइन परीक्षांच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेत MPSCच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची मागणी केली. ऑनलाइन परीक्षांमध्ये हॅकिंग आणि पेपरफुटीची शक्यता अधिक असल्याचा दावा करत, UPSC तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होऊ शकतात तर MPSCच्या परीक्षाही ऑफलाइन घेण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे नोकरीची संधी मिळाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील संगणक परिचालकांच्या भरतीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. संगणक परिचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या खासगी कंपनीला दरवर्षी सुमारे 250 कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप करत, हा निधी थेट कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अशा पद्धतीमुळे सरकारचे हजारो कोटी रुपये वाया जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
राजकीय घडामोडींवर बोलताना ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या संपर्काबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मिश्किल शैलीत, “शिवसेना शिवसेनेच्याच संपर्कात राहणार. पाणी पाणी से मिलने वाला है,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत, त्या वरिष्ठ नेत्या असून त्यांचाही विचार झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Bachchu Kadu Launches Scathing Attack on Maharashtra Government
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली