विशेष प्रतिनिधी
पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीला आज लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राइम सीन रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिस (चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण) चाचणी करण्यात आली.
तपास पथकाने घटनास्थळी संपूर्ण घटनेची पुनर्रचना करत आरोपीच्या हालचालींची पडताळणी केली. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि आरोपीच्या जबाबाची तुलना करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. यामधून आरोपीची घटनास्थळी नेमकी भूमिका आणि घटनाक्रम स्पष्ट करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
या प्रकरणातील दुसरी आरोपी सिया गोयल हिचे क्राइम सीन रिक्रिएशन यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर आता चेतन चौधरीवरही हीच प्रक्रिया राबविण्यात आली असून, तपासातील विविध पुराव्यांशी त्याच्या हालचालींची सांगड घालण्याचे काम सुरू आहे.
गेट अॅनालिसिस ही एक फॉरेन्सिक पद्धत असून, एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या शैलीचे विश्लेषण केले जाते. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी घातलेली एक संशयित व्यक्ती दिसून आली होती. त्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीची तुलना आरोपी चेतन चौधरीच्या चालण्याशी करून त्याची ओळख निश्चित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपींवर आहे. या गुन्ह्याचा तपास अधिक भक्कम करण्यासाठी पोलिसांकडून फॉरेन्सिक, डिजिटल आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात असून, क्राइम सीन रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिसमधील निष्कर्ष आरोपपत्रासाठी महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. तपास अद्याप सुरू आहे.
Chetan Chaudhary Taken to Lohagad Fort for Crime Scene Reconstruction in Ketan Agarwal Murder Case
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी