विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई लाेकलमधील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी उपनगरी रेल्वेत रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक-होमगार्डची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांशी संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये विविध ठिकाणी प्रवाशांवर झालेल्या हल्ला तसेच वाढत्या चेन स्नॅचिंग, पाकीटमारी, मोबाइल चोरी, गर्दुल्यांचा वावर आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे आ. रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी मांडली. या चर्चेला उत्तर देताना कदम यांनी सुरक्षित प्रवासाबाबत माहिती दिली. स्थानकांना एकापेक्षा अधिक प्रवेशद्वारे असल्याने प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नसले, तरी प्लॅटफॉर्म, रेल्वे डबे, अचानक तपासण्या, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख आणि संशयितांवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या १७७ रेल्वे स्थानकांमध्ये सुमारे ६,९०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर सुरू आहे. याच्या मदतीने अलीकडील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या १५ तासांत अटक केल्याचे कदम यांनी नमूद केले.
रेल्वे पोलिसांची मंजूर ४,१८५ पदांपैकी सुमारे ३,५०० पदे भरली असून, १,५२० होमगार्ड, ११२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कार्यरत आहेत. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत हे मनुष्यबळ अपुरे असल्याने रेल्वे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे कदम यांनी सांगिले.
Home Guards to Patrol Women’s Coaches in Local Trains for 13 Hours Daily
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी