Maharashtra Bans : शाळांजवळ स्टिंगसह एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी, कठोर कारवाईचा मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Maharashtra Bans विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांच्या आवारात आणि परिसरात स्टिंगसह कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स तसेच आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिला.Maharashtra Bans

स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना झिरवाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार राहुल कुल आणि वरुण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.Maharashtra Bans



पालक, शिक्षकांनी तक्रारी नोंदवाव्यात

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, शाळांच्या परिसरात कॅफिनयुक्त पेये आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची विक्री आढळल्यास पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

विद्यार्थ्यांना जंक फूड आणि कॅफिनयुक्त पेयांपासून दूर ठेवून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात उभारल्या जाणार २२ नवीन प्रयोगशाळा

अन्न सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यात सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे कार्यरत असलेल्या अन्न तपासणी प्रयोगशाळांव्यतिरिक्त पुणे, नाशिक, रायगड आणि यवतमाळ येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत.

याशिवाय सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्याचा सरकारचा मानस असून, त्यामुळे अन्न नमुन्यांच्या तपासणीची प्रक्रिया अधिक जलद आणि प्रभावी होणार आहे.

एनर्जी ड्रिंक्सच्या नमुन्यांची तपासणी सुरू

एप्रिल २०२५ ते मे २०२६ या कालावधीत स्टिंग एनर्जी ड्रिंकचे २७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी १० नमुने निर्धारित निकषांनुसार योग्य आढळले असून उर्वरित नमुन्यांची तपासणी सुरू आहे.

तसेच एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत विविध कंपन्यांच्या ११५ एनर्जी ड्रिंक्सचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६३ नमुने प्रमाणित, एक नमुना निकृष्ट दर्जाचा, तर सहा नमुने मिथ्याछाप (Misbranded) आढळले असून उर्वरित नमुन्यांच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसून शाळांच्या परिसरात अपायकारक खाद्यपदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Bans Sting, Energy Drink Sales Near Schools; Minister Warns of Strict Action

महत्वाच्या बातम्या