Rahul Gandhi : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेसची उशिरा उडी, प्रसिद्धीसाठी राहुल गांधींचा ‘सरप्राइज शो’

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:Rahul Gandhi  नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थी अनेक दिवसांपासून रस्त्यावर संघर्ष करत असताना अंतर राखणाऱ्या काँग्रेसने आंदोलन पेटल्यानंतर अचानक आक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. आंदोलन हायजॅक करून प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केला.Rahul Gandhi

राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २१ जुलै रोजी काही नेत्यांसह पायी लोककल्याण मार्गाकडे कूच केले. या आंदोलनाची माहिती काँग्रेसच्या अनेक खासदारांनाही नव्हती. अचानक आखलेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि प्रशासनाची धावपळ उडाली. काही तासांनंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत आंदोलन संपवले.Rahul Gandhi



मात्र, काँग्रेसच्या या आक्रमकतेच्या वेळेवरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि तरुणांनी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केल्यानंतर आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे नेते त्यात सहभागी झाले. काँग्रेसने मात्र सुरुवातीच्या टप्प्यात या आंदोलनापासून अंतर राखल्याचे दिसून आले.

२० जुलै रोजी विद्यार्थ्यांचा संसदेकडे मोर्चा निघाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधूर आणि बळाचा वापर केला. त्यानंतर आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आणि काँग्रेसने आपली भूमिका अचानक बदलली. काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरुवातीपासून निर्णायक लढा उभारण्याऐवजी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याचे राजकीय नेतृत्व ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला का, असा सवाल उपस्थित होत आहे.

संसद भवनातून बाहेर पडताना प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत सरकार तरुणांचा आवाज दडपत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींना “युवा-विरोधी” ठरवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दुसऱ्या दिवशी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र, जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधण्याऐवजी काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर स्वतंत्र धरणे आंदोलन उभारले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ लढ्यापेक्षा काँग्रेसच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचीच अधिक चर्चा झाली.

सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलक काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. बोलणी निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना हटवून ताब्यात घेतले.
नीटमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई हे गंभीर प्रश्न असतानाही काँग्रेसची भूमिका सुरुवातीला सावध आणि नंतर अचानक आक्रमक झाल्याने तिच्या राजकीय हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सातत्यपूर्ण पाठिंबा देण्याऐवजी आंदोलनाचा जनक्षोभ वाढल्यानंतर राहुल गांधी मैदानात उतरल्याने हा तरुणांसाठीचा लढा होता की प्रसिद्धीसाठी आखलेला राजकीय ‘सरप्राइज शो’, अशी टीका आता होऊ लागली आहे.

Congress Jumps Late Into Student Protest, Rahul Gandhi’s ‘Surprise Show’ for Publicity

महत्वाच्या बातम्या