विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात ३० लोकांचा बळी जाण्याची घटना मनाला वेदना देणारी आहे. ज्यांनी आपली माणसं गमावली त्या सगळ्या कुटुंबासह माझ्या संवेदना आहेत, असे म्हणताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर झाले.
पोलीस प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांची पथकं काम करत आहेत. तसंच जेवढी व्यवस्था आम्ही करु शकत होतो ती आम्ही तैनात केली आहे. अशीही माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यातही काही पर्वण्या असणार आहेत. दरम्यान मौनी अमावस्येची पर्वणी साधण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या ३० भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. मौनी अमावस्या ही मुख्य पर्वणी मानली जाते. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासूनच आजच्या तिथीला स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी प्रयागराजमध्ये होऊ लागली होती. अनेक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नानही करण्यास सुरुवात केली होती. तसंच अनेक भाविक ब्रह्म मुहूर्ताची वाट पाहात होते. त्याचवेळी आखाडा मार्गावर एक अप्रिय घटना घडली. या घटनेत ९० हून अधिक लोक गंभीर किंवा किरकोळ स्वरुपात जखमी झाले.
आखाडा मार्गातलं बॅरिकेटिंग तोडणं, त्यावरुन उड्या मारुन जाणं यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये ३६ जखमींवर उपचार सुरु आहेत. तर बाकी जखमींना त्यांच्या कुटुंबातले सदस्य आपल्यासह घेऊन गेले आहेत. ही घटना खूपच क्लेशदायक आहे. असं योगी आदित्यनाथ म्हणाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेला त्रिवेणी संगम अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे महाकुंभमेळ्याच्या दरम्यान आणि मौनी अमावस्येसारख्या विशेष पर्वण्यांना त्रिवेणी संगमावर स्नान करणं पवित्र मानलं जातं. स्नान करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Chief Minister Yogi Adityanath shed tears over Prayagraj incident
महत्वाच्या बातम्या