विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान चोरट्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. यावरून खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यापासून अनेकांनी वक्तव्ये केली आहेत. त्यांना सैफची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने सल्ला दिला आहे. सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना याप्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो. तसेच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये, कारण पोलीस तपास करत आहेत, असे करीनाने म्हटले आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूर खानच्या टीमने अधिकृत निवेदन दिले आहे. “रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना याप्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो, तसेच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये, कारण पोलीस तपास करत आहेत. काळजीबद्दल सर्वांचे आभार,” असं करीना कपूर खानच्या टीमने निवेदनात म्हटलं आहे.
गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. नंतर सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यात सैफच्या कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. सध्या मुंबई पोलीस वेगाने या प्रकरणाचा तपास करत असून सैफ अली खानच्या घरी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तर म्हणाले, १५ दिवसांपूर्वी सैफ अली खानचं कुटुंब मोदींच्या भेटीला गेलं होतं, त्यानंतर आता हा हल्ला झाला. जे मोठे कलाकार आहेत त्यांना घराबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. तिथे सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. सैफअली खानवर हल्ला होतो हा नरेंद्र मोदी यांना हा खरं म्हणजे धक्का आहे. पंधरा दिवसांपूर्वी सैफअली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता सैफअली खान वरती हल्ला झाला कोणी केला चोराने की कोणी ?