विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृह मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार या निर्णयावर टीका करत “तो चुकीचा मार्ग होता” असे म्हटल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
हिमाचल प्रदेशातील कसौली येथे झालेल्या खुशवंत सिंग लिटरेरी फेस्टिव्हलमध्ये भाषण करताना ते म्हणाले “ब्ल्यू स्टार हा सुवर्ण मंदिर परत मिळविण्याचा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर आम्ही दाखवून दिले की सेना न वापरता योग्य पद्धतीने मंदिरातील अतिरेक्यांना बाहेर काढता येते. ब्ल्यू स्टार हा चुकीचा निर्णय होता आणि इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत जीव देऊन चुकवली.”
चिदंबरम पुढे म्हणाले, “हा निर्णय केवळ इंदिरा गांधींचा नव्हता. सेना, पोलिस, गुप्तचर संस्था आणि नागरी प्रशासन यांचे एकत्रित निर्णय होते. त्यामुळे दोष केवळ गांधींवर देता येत नाही.”
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (SGPC) चे सरचिटणीस भाई गुरचरणसिंह ग्रेवाल म्हणाले, “चिदंबरम साहेब बरोबर आहेत. ब्ल्यू स्टार योग्य नव्हता आणि तो टाळता आला असता. इंदिरा गांधी त्या काळी पंतप्रधान होत्या आणि निर्णय त्यांचाच होता. सुरुवातीपासून काँग्रेस सत्य दडवत आली आहे. आता जर त्यांनी प्रामाणिकपणे सत्य सांगितले असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करतो.”
मात्र, चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येच नाराजीचा सूर उमटला आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत विचारले,“५० वर्षांनंतर चिदंबरम यांना पक्ष आणि इंदिरा गांधींवर टीका करण्याची गरज का वाटली? तेच वक्तव्य आज भाजप आणि पंतप्रधान मोदी करत आहेत. हे दुर्दैवी आहे.”
अल्वी यांनी पुढे आरोप केला की, “चिदंबरम काही प्रलंबित प्रकरणांच्या दबावाखाली आहेत का, हा प्रश्न आता उपस्थित होतो.”
दरम्यान, केंद्रीय संसदीय व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरन रिजिजू यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्यावर टीका करत म्हटले,“चिदंबरमजी आता उशिरा का होईना, काँग्रेसच्या चुका मान्य करत आहेत. त्यांनी आधी कबूल केले की मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांना भारत अमेरिकेच्या दबावामुळे प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आता ते सांगत आहेत की सुवर्ण मंदिरावरील ब्ल्यू स्टार कारवाईही चूक होती.”
१९८४ मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ज्यात भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिरातील खलिस्तान समर्थक अतिरेक्यांवर कारवाई केली, त्यानंतर इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांकडून हत्या झाली होती. चिदंबरम यांच्या विधानाने हा ऐतिहासिक आणि भावनिक वाद पुन्हा उफाळून आला असून, काँग्रेससाठी नव्या राजकीय डोकेदुखीचे कारण ठरले आहे.
Chidambaram’s Remark Rekindles Old Controversy
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना