विशेष प्रतिनिधी
लखनऊ: लग्नाचे वचन देऊन चार वर्ष एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे राठोड यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राठोड यांना अटक करण्यात आली आहे.राकेश राठोड यांच्यावर एका महिलेच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्यांनी लग्नाचे वचन देऊन चार वर्ष एका महिलेचा लैंगिक शोषण केल्याचा राठोड यांच्यावर आरोप आहे.
उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. न्यायाधीश राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने अटकपूर्व जामीनावरील सुनावणीनंतर हा निर्णय दिला. दरम्यान फिर्यादीने चार वर्षांनंतर हा खटला दाखल केल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्त्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र न्यायालयाने याचिका निकाली काढत राठोड यांना सत्र न्यायालयासमोर आठवडाभरात हजर होण्याचे निर्देश दिले.
महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर १७ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तीन दिवसांनंतर राठोड यांच्या वकीलांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सीतापूर येथे याचिका दाखल केली होती. एमपी-एमएलए न्यायालयाने जानेवारी २३ रोजी राठोड यांची ही याचिका फेटाळली.
Congress MP arrested for sexually abusing woman with promise of marriage
महत्वाच्या बातम्या