विशेष प्रतिनिधी
लातूर: शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अभय दिले आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी संताप व्यक्त केला असून अजितदादा शब्दांचे पक्के नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या सुरज चव्हान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना लातुरात घडली होती. या घटनेनंतर छावाचे विजयकुमार घाडगे पाटील ॲम्बुलन्सद्वारे पुण्यात जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) कृषीमंत्र्यांचा राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मंगळवार पर्यंतची मुदत मागितली होती. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र, अद्याप माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही, तसेच माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवलं जाण्याची शक्यता देखील कमी दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे माफी मागितली. तसेच, भविष्यात अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत, असे ठोस आश्वासन दिले आहे.
विजयकुमार घाडगे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मला केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी व्हिडीओ पाहावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, आम्हाला सांगता आले असते की तिथे सुनिल तटकरे होते, बाबासाहेब पाटील होते पण आमची औलाद खोटे बोलणारी नाही जशी तुमची आहे. ‘तुमचे म्हणजे लेकरू आणि दुसऱ्याच म्हणजे बाब्या’ अस चालणार नाही.
तुमच्यावर हल्ला झालेल्या काही कार्यकर्त्यांना टेंडर दिली जात आहे असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले आमच्यावर हल्ला करणाऱ्यांना बक्षिसाचे वाटप होत आहे, त्यांना पुरस्कार दिले जात आहेत, आमचा या सरकारवरचा विश्वास उडाला आहे, अजित पवारांनी आम्हाला सांगितले होते की मी शब्दाचा पक्का आहे, पण आता समजल अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत, आम्ही आता शेतकऱ्यांसाठी यात्रा सुरू करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत व सरकारच्या विरुद्ध मोठा आवाज उठवणार आहोत, आता कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात आमचा विश्वास उडाला आहे, अस मत विजयकुमार घाडगे यांनी व्यक्त केले.