विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या मराठी आणि अमराठी वाद पुन्हा सुरु आहे. काही ठिकाणी या वादाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले आहे.या घटनेनंतर वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर संयमित तोडगा मांडला आहे. जो कोणी महाराष्ट्रात राहतो, त्याने जर चांगलं मराठी बोलता येत नसेल, तर स्पष्टपणे सांगावं की आम्हाला मराठी येत नाही, पण आम्ही मराठीचा आदर करतो आणि ती शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असे सांगण्याचा सल्ला त्यांनी परप्रांतीयांना दिला आहे. Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, आपण ज्या राज्यात राहतो, तिथल्या भाषेचा आदर करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी बोलायला यायला हवं. पण जर एखाद्याला मराठी येत नसेल, तर त्यांनी अरेरावी करण्याऐवजी नम्रपणे सांगायला हवं की त्यांची मातृभाषा हिंदी किंवा इंग्रजी आहे आणि ते मराठी शिकण्यासाठी तयार आहेत. एवढं सांगितल्यावर कुठेही वाद होणार नाही.
मातृभाषेचा सन्मान असायलाच हवा. पण प्रत्येक राज्यात एकमेकांच्या भाषेचा आदर केला गेला पाहिजे. हिंदी आणि इंग्रजी या देशभर वापरल्या जाणाऱ्या माध्यम भाषा आहेत. मात्र, स्थानिक भाषेचा आदर राखणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, असे आवाहन पवार यांनी केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. पण या अभिमानात गर्व निर्माण करून इतर भाषिकांशी द्वेषाने वागणे हे योग्य नाही. एकत्र, हसत-खेळत राहणं आणि विविधतेतून एकता साधणं हेच आपलं खरे बळ आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यपाल हिंदी भाषेच्या समर्थनार्थ भूमिका घेत असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला असता अजित पवार म्हणाले, “राष्ट्रपती आणि राज्यपाल ही घटनात्मक आणि सर्वोच्च पदं आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही कोणतीही टीका करणं योग्य ठरत नाही. त्यांनी काय म्हटलं, हे त्यांनी स्पष्ट करावं. परंतु आमच्या दृष्टिकोनातून सर्व भाषांचा सन्मान राखणं गरजेचं आहे.