विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे यासाठी आग्रह सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांचा पक्षही अजित पवार यांच्या नावावर दावा सांगेल, कारण त्यांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. छगन भुजबळ यांच्या या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे.
2022 मध्ये शिंदे आपल्या पक्षाच्या 39 आमदारांसह उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर विकासकामांसाठी निधी न दिल्याचा आरोप उघडपणे केला होता. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर अजित पवारही शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले असताना त्यांना अर्थमंत्रालय देण्यास शिंदे गटाकडून विरोध झाला. त्यामुळे अजित पवारांना यावेळी सरकारची कमान एकनाथ शिंदे यांच्या हातात जाताना बघायचे नाही. त्यामुळेच भुजबळ यांचे हे वक्तव्य आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन तीन दिवस उलटले आहेत, मात्र आजही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. तर मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र 132 जागांसह महाआघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपमध्ये अद्यापही मौन आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचीही अद्याप निवड झालेली नाही.
दरम्यान पाच अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या पाठिंब्याने भाजपच्या आमदारांची संख्या 137 झाली आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 145 आमदारांपैकी आता फक्त आठ आमदारांची कमतरता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठिंबा दिला आहे.