विशेष प्रतिनिधी
मुंबई : जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे 1.40 कोटी रुपयांचे बिले वेळेवर न मिळाल्याने हर्षल पाटील (वय 35) या सांगली जिल्ह्यातील तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षलने शेतात जाऊन गळफास घेतला. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. Jaljeevan Mission
हर्षल पाटील याला ग्रामीण भागात घराघरात पाणी पोहोचवण्याच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. मात्र, काम पूर्ण करूनही बिलाची रक्कम मिळाली नाही. शासनाच्या विलंबामुळे आलेल्या मानसिक तणावामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले, “हर्षल पाटील या होतकरू अभियंता कंत्राटदाराने शासनाच्या अनास्थेमुळे व भ्रष्ट कारभारामुळे आत्महत्या केली. सरकारच्या खोट्या रोजगाराच्या आश्वासनांमुळे सामान्य शेतकऱ्यांची मुले कंत्राटदारीकडे वळत आहेत. पण त्यांच्या मेहनतीचे चीज होत नाही, उलट त्यांच्या स्वप्नांवर सरकार पाणी फेरत आहे.”
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, “शासनाकडे निधी नसतानाही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटांचे वाटप करण्यात आले. आता राज्यभरातील कंत्राटदार सरकारकडे थकलेल्या बिलासाठी याचना करत फिरत आहेत. ही समस्या एका खात्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण यंत्रणेचीच आहे.”
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनीही गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले, “जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर्षानुवर्षे सुरू आहेत, तसेच आता कंत्राटदारही आत्महत्या करू लागतील याची भीती वाटते. सरकारने या गंभीर परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात.”
हर्षल पाटीलच्या आत्महत्येने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नसून, त्याच्यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचे जीवनही संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने वेळेवर देयक अदा न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी एकमुखी मागणी होऊ लागली आहे.
Contractor fighting for Jaljeevan Mission bill commits suicide
महत्वाच्या बातम्या