विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस रियाला पाठवण्यात आली आहे. Sushant Singh Rajput
रियानं सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन बहिणींविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवर आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही नोटीस म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे, ज्यामध्ये तक्रारदाराला तपास यंत्रणेच्या अहवालावर आक्षेप घेण्याची संधी दिली जाते. मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी आर.डी. चव्हाण यांनी याप्रकरणी जारी केलेल्या नोटीसला 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. सीबीआयने मार्च 2025 मध्ये हा अहवाल कोर्टात सादर केला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीनं साल 2020 मध्ये सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितु सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. ज्यात त्यांचे डॉ. तरुण नथुराम यांचाही समावेश होता. रियाचा आरोप होता की, या तिघांनी संगनमतानं सुशांतसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरुन काही औषधं आणली होती. सुशांत हा बायपोलर डिसऑर्डरनं ग्रस्त होता. त्याच नैराश्यात तो अनेकदा औषधे घेणे बंद करायचा, उपचारात हयगय करायाचा. हा एक मानसिक आजार असल्यानं मानसोपचारतज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध मिळणं अशक्य आहे. मात्र तरीही त्याच्या बहिणींना एका कॉल किंवा मेसेजवर ही औषधे मिळत होती. त्यासाठी या दोघी डॉक्टरच्या मदतीनं बनावट प्रिस्क्रिप्शन वापरत असल्याचा रियानं आरोप केला होता.
14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूत त्याच्या वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळला होता. बराचकाळ चर्चेत राहिलेल्या या प्रकरणानंतर संपूर्ण बॉलिवूडवर एनसीबीनं समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वात एनडीपीएसनुसार कारवाईची मोहीमच हाती घेतली होती. दीपिका पदुकोणपासून अनेकांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयनं केला होता. दरम्यान बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आपल्या तपासबंद अहवालातून स्पष्ट केलंय की, याप्रकरणी कोणाविरुद्धही गुन्हेगारी कट रचल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास बंद करतोय. या अहवालावरील प्रक्रियेचा एक भाग म्हणून रियाला कोर्टानं ही नोटीस बजावली आहे.