विशेष प्रतिनिधी
मुंबई : कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत. जेव्हा लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडायची वेळ होती, तेव्हा हेच लोक म्हणायचे आमचे हात रिकामे आहेत. आता अचानक भावनिक मोर्चे काढून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला जातोय, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. Eknath Shinde
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटांनी आज छत्रपत संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला आहे. त्यावर हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले, हे कसले हंबरडा मोर्चे काढतात? सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आता शेतकऱ्यांच्या नावाखाली हंबरडा फोडत आहेत. हे पुतणा-मावशीचे प्रेम आहे. निव्वळ राजकीय नाटक आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहेत.
आम्ही त्यांच्या बांधाबांधावर गेलो, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि ठरवले की, या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. म्हणूनच आम्ही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून, अटीशर्ती न पाहता मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली, असे संभाजीनगरमधील मोर्चाला एमआयएमचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर टीका करताना शिंदे म्हणाले, हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी कोणालाही सोबत घेतील.
आज एमआयएम आहे, उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील. त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही. मागच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. काहींनी दहशतवाद्यांच्या कबरी सजवण्याचे काम केले होते. आता तेच लोक घटनात्मक पदांवर, सर्वोच्च न्यायालयावर आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. पण आज तेच आयोगाकडे जात आहेत. ही चांगली सुधारणा म्हणावी लागेल.
आमचा एकच ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे ब्रँड. त्याच विचारांवर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर महायुती येणाऱ्या निवडणुकीत विजयी होणार, असा मला ठाम विश्वास असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, मी फक्त बाळासाहेब ब्रँड ओळखतो, बाकी कोणताही नाही. मला फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड माहिती आहे
शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आम्ही सांगितलं होते. आज त्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होत आहेत. आम्ही 32 हजार कोटींचे पॅकेज दिले, 47 हजार हेक्टरी मदत केली, तर जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मनरेगामार्फत प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिले. इतिहासात कधीच इतकी मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती, असा दावा त्यांनी केला.
शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी आणखी चांगली होईल. आम्ही प्रत्यक्ष मदत पोचवली, मोठमोठे किट दिले. पण हे लोक शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत आहेत. शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यात अश्रू पाहून किमान बिस्कीटचा पुडा तरी दिला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Eknath Shinde’s Sharp Counterattack on Uddhav Thackeray”
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना