विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या दमदार वाटचालीचे कौतुक करताना ‘मॉर्गन स्टॅन्ले’ या जागतिक वित्तीय सेवा पुरविणाऱ्या नामवंत संस्थेने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० मध्ये एक लाख कोटी डॉलरचे (एक ट्रिलियन डॉलर) लक्ष्य गाठेल, असा विश्वास आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. Maharashtra
महाराष्ट्राचा उच्च साक्षरतेचा दर, आर्थिक शिस्त, मोठ्या प्रमाणात होणारी देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आणि स्थिर नेतृत्व यामुळे राज्य आर्थिक विकासाचा एकेक टप्पा गाठत असल्याचे प्रशस्तिपत्रही अहवालात देण्यात आले आहे. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्राबरोबरच उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर लक्ष्य केंद्रित केले. वाढत्या औद्योगिकीकरणावर भर देत या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. धातू, वाहन, अन्नप्रक्रिया, पेट्रोलियम आणि यंत्रसामग्री उद्योगात जाणीवपूर्वक गुंतवणूक वाढ केली गेली, असेही अहवालात म्हटले आहे. ‘महाराष्ट्र-लिडिंग द वे’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मॉर्गन स्टॅन्लेसारख्या नामवंत संस्थेने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख मांडला, ही आमच्यासाठी आनंदाची आणि प्रेरणा देणारी बाब आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, समाजाचे व्यापक कल्याण, निर्यात, धोरण सुधारणांच्या मार्गावर आमची घोडदौड सुरूच राहील.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात १९.६ अब्ज डॉलरची म्हणजे १.६० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनाच्या १७ टक्के वाटा महाराष्ट्राचा, वाहनांचे निर्मिती आणि सुट्या भागांच्या उत्पादनात हा वाटा २० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे, असे अहवालात म्हटले आहे.
५३६ अब्ज डॉलर एवढा सध्या महाराष्ट्राचा जीडीपी (सकल राज्यांतर्गत उत्पादन) असून, तो जगातील २८ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या सिंगापूरच्या जीडीपीच्या बरोबरीचा आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकडेवारीसह सातत्याने करत असतात. या दाव्याला मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात दुजोरा देण्यात आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ३९ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली. महाराष्ट्र पायाभूत सुविधांचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारत असल्याचा उल्लेखही अहवालात आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, समृद्धी महामार्गा या प्रकल्पांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर गती मिळणार आहे. सक्षम नेतृत्वाअंतर्गत होत असलेल्या या घडामोडींमुळे गुंतवणूकदेखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत.