विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालातले अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसतच नाही. निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचं काय घेऊन बसलोय आपण? निवडून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढ म्हणून, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी मुंबईत वरळी येथे मनसेचा मेळावा घेतला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालाबाबत शंका व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. ते सात वेळा ७० ते ८० हजार मताधिक्यांनी निवडून यायचे त्यांचा १० हजार मतांनी पराभव झाला. कदाचित अनेक लोक बोलतील राज ठाकरे पराभूत झाल्याने हे बोलत आहेत, मी नाही संपूर्ण महाराष्ट्र बोलतो आहे. जे निवडून आले आणि सत्तेत आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांनाही शॉक बसला आहे.
भाजपाचे नेते भेटायला येतात त्यावर त्यांना काय नका येऊ असं सांगणार का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांचा एक किस्सा सांगत राज ठाकरेंनी भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, राजकारणाचा सगळा चिखल झाला आहे, त्यात तुम्ही जागरुक राहिलं पाहिजे. अनेक लोक मला सांगतात, भाजपाच्या नेत्यांना भेटायला नको? समोरचा माणूस म्हणाला चहा प्यायला घरी येतो तर त्याला काय सांगायचं? घरीच चहा पी. तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल? मला जेव्हा कुणीही भेटायला येतं तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. मी मराठीचा बाणाही बोथट करत नाही. मध्यंतरी नाशिकला होतो, समोरुन चंद्रकांत पाटील आले. नमस्कार वगैरे करुन म्हणाले मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. मला सांगा ही परिस्थिती तुमच्यावर आली. तर काय कराल? चहा कशाला प्यायचा? कशाला घरी येता? असं सांगू का? एक माणूस समोरुन सांगतोय की चहा प्यायला येतो तर येच म्हणणार.
त्यापुढचा किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले, चंद्रकांत पाटील नाशिकच्या भेटीनंतर मुंबईत मला भेटायला आले. बरं हे बाहेर जाऊन वेगळे बोलतात. बरेच दिवस आपण भेटलो नाही वगैरे एवढंच असतं. मुंबईत चंद्रकांत पाटील आले, माझ्याशी चर्चा केली. चहा-पाणी झाल्यावर बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं भेटीत काय झालं? तर काय सांगावं? सहज भेट होती, सदिच्छा भेट होती सांगावं ना. चंद्रकांत पाटील यांनी खांदा उंच करुन शक्ती दाखवल्यासारखी कृती केली. ती त्यांनी का केली? मला अजूनही कळलेलं नाही. या भेटीनंतर पत्रकार मला विचारत होते त्यांनी असं का केलं? मी म्हटलं म्हणजे काय? आम्ही दोघंही एकमेकांना तोच प्रश्न विचारत होतो. बाई आणि बुवा एकत्र भेटले की लफडंच असलं पाहिजे असं पत्रकारांना वाटतं.
पण नॉर्मलही भेटू शकतात ना. आधी राजकारणात सगळे एकमेकांना भेटत होते. पक्षाच्या धोरणांमध्ये तडजोड होत नव्हती. आत्ताही तसं नाही. चंद्रकांत पाटील यांनी ती कृती का केली? मला माहीत नाही. काय मला त्यांनी कडेवर घेतलं होतं की मी कोपरात अक्रोड ठेवून त्यांना फोडून दाखवला. काय मला काहीच कळलं नाही. एक लक्षात ठेवा, कुणीही भेटायला आलं तरीही पक्षाचं प्रेम आणि धोरण बाजूला ठेवणार नाही.
Raj Thackeray’s poignant comment after the assembly election results
महत्वाच्या बातम्या