विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. हे संकेत खरे ठरणार असून आता पवारांना सक्तीने निवृत्ती घेण्याची वेळ येणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने राज्यसभेवर निवडून जाणे इतके संख्याबळ त्यांच्याकडे राहिले नाही.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता राज्यसभा आणि विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या जागांवर उमेदवार निवडून आणणे अशक्य होणार आहे. २ एप्रिल २०२६ ला राज्यसभेतील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. त्यात मविआचे ४ तर महायुतीच्या २ खासदारांचा समावेश आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे मविआने एकत्रित निवडणूक लढवल्यास त्यांना राज्यसभेतील एकच जागा जिंकता येऊ शकते. उर्वरित ३ जागा गमवाव्या लागू शकतात. तर, महायुतीकडील संख्याबळामुळे त्यांना राज्यसभेत ५ जागांवर सहज विजय मिळू शकतो. २०२८ मध्ये संजय राऊत यांचाही कार्यकाळ संपत आहे. त्यांना पुन्हा निवडून येणे अवघड बनले आहे.
राज्यसभेत महाराष्ट्राच्या एकूण १९ जागा आहेत. प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, रजनी पाटील, शरद पवार हे मविआचे ४ आणि भाजपचे धैर्यशील पाटील आणि रिपाइंचे रामदास आठवले असे एकूण ६ खासदार २ एप्रिल २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. पाच महिन्यांत राज्यसभेची निवडणूक होईल. राज्यात निवडणूक निकालात भाजपला सर्वाधिक १३१ जागा, शिवसेना५७, राष्ट्रवादी ४१ अशा महायुतीला २२९ जागा, तर काँग्रेस १६, उद्धव ठाकरे २०, शरद पवार पक्ष १० अशा मविआला ४६ जागा मिळाल्या आहेत. राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता असते.
मात्र मविआतील तीन पक्षांमधील कोणत्याही एका पक्षाला २० पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक लढवताना तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली तरच त्यांना एकाच सदस्याला राज्यसभेवर निवडून आणता येऊ शकतो. उर्वरित जागांवर मविआला पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मविआला ३ जागांवर फटका बसू शकतो. तसेच इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) आणि संजय राऊत (ठाकरे गट) यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार आहे. त्यांची निवडणूक ही अवघड होणार आहे.
जागांवर मविआला पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मविआला ३ जागांवर फटका बसू शकतो. तसेच इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) आणि संजय राऊत (ठाकरे गट) यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार आहे.
शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे निवृत्त होत असलेल्या सदस्यांपैकी अथवा निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्या मातब्बर नेत्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळते हे पाहावे लागणार आहे. त्यासाठी त्या नेत्याच्या नावावर महाविकास आघाडीत एकमत होणे गरजेचे आहे.
२०२६ मध्ये महाराष्ट्रातील या जागा होणार रिक्त
२ एप्रिल २०२६ पर्यंत प्रियंका चतुर्वेदी (उद्धव ठाकरे गट), फौजिया खान (शरदचंद्र पवार गट), रजनी पाटील (काँग्रेस), शरद पवार (शरदचंद्र पवार पक्ष), धैर्यशील पाटील (भाजप), रामदास आठवले (रिपाइं) यांची मुदत. ४ जुलै २०२८ पर्यंत इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) आणि संजय राऊत (ठाकरे गट) यांची मुदत आहे