विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला. त्यासाठी संतोष देशमुख यांच्या खुनाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे केले आहे का हे पाहावे लागेल असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली. यावरून धस यांच्यावर टीका होत आहे. कोण कोणाला भेटले यावर राजकारण योग्य नाही. लोकशाहीत संवाद महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर म्हटले आहे.
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
यावर संजय राऊत म्हणाले, उद्या तुम्ही दाऊदला भेटाल, छोटा शकीलला भेटाल, मी कोणावर व्यक्तिगत आरोप करत नाही. पण राजकारणात नैतिकतेचे पालन तरी व्हावं सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं. एका खुनाला वाचा फुटली .खरे आरोपी आकाचा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले, आम्ही आणले नाही . बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं आमचा धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं, तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली. बीडमध्ये वातावरण निर्मिती केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला गेला. संतोष देशमुख प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का नाही लढाई केली?
बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे? हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावे असे आवाहन करत राऊत म्हणाले, मुख्य सूत्रधार मुंडे म्हणता आणि त्यांनाच रात्री भेटायला जाता, मग संशय निर्माण होणारचं. बीड मधल्या मिर्जापुरचा डॉन त्यांना म्हणता. त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्यांचं समर्थन करतात. मिली भगत आहे की, काय यांच्यामध्ये?बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे, हे स्पष्ट मी बोलतो
धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की, नाही? यापेक्षा कोणी घ्यायचा आहे ठरवलं पाहिजे. तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? कोणाला वाचवत आहात? असा सवाल त्यांनी केला.