विशेष प्रतिनिधी
नाशिक : समस्त नाशिककरांसाठी एक अनोखा सन्मान सोहळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये रंगला. माहेरच्या गोदाकाठच्या संस्कारातूनच पुढे आणखी चांगले कार्य करून दाखवीन, अशी ग्वाही सत्कारमूर्ती विजयाताईंनी जुन्या आठवणींना उजाळा देत समस्त नाशिककरांना दिली. माहेरच्या आपल्या माणसांनी केलेल्या कौतुकाने त्या भारावून गेल्या होत्या. त्यामुळेच शाळेच्या आणि कॉलेजच्या आठवणींमध्ये, गोदाकाठी खेळांमध्ये त्या पुन्हा रमून गेल्या. निमित्त होते, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केलेल्या अनोख्या सत्काराचे.
नाशिकच्या माहेरवाशीण विजयाताई रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्यानंतर त्यांचा महाराष्ट्रातला पहिलाच सत्कार करण्याचा समस्त नाशिककरांना मिळाला. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने त्यांचा आणि नवदुर्गांचा सन्मान केला. या नेत्रदीपक सोहळ्यात विजयाताई भावूक झाल्या होत्या. कारण समोर त्यांच्या माहेरची सगळी आपली माणसं नेत्रांची निरांजने करून त्यांच्या कर्तृत्वाला ओवाळत होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रगती डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते विजयाताईंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना विजयाताई म्हणाल्या, माहेरचा सत्कार म्हटल्यावर सुरुवातीला खरंतर मला संकोच वाटला होता, कारण मी एवढी मोठी आहे, असे मला कधी वाटलेच नाही, पण माहेरच्या आपल्या माणसांनी केलेले कौतुक म्हणून मी ते निमंत्रण स्वीकारले आणि आज खरोखरच मला त्याबद्दल धन्यता वाटली. कारण माझ्या बालपणीच्या, तरुणपणीच्या सगळ्या मित्र मैत्रिणी मला कितीतरी वर्षांनी भेटल्या. माझ्या अनेकींनी मला कडकडून मिठी मारली. माझ्या सारडा विद्यालयातल्या, एचपीटी महाविद्यालयातल्या आठवणी त्यांनी उजळून काढल्या.
मला माझ्या शिक्षिका भेटल्या त्यांच्या डोळ्यातले कौतुक मला पुन्हा पाहता आले. मी नाशिक सोडून ३६ वर्षे झाली. मी लग्नानंतर मी संभाजीनगरकर झाले, पण नाशिक मध्ये सत्कार आयोजित करून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने माझ्या जुन्या मैत्रिणी भेटण्याचा योग आणला, याचा मला विशेष आनंद झाला. मी पणा बाजूला करून आम्ही आणि आपण सगळे या भावनेतून ही समिती काम करते आहे. जे संस्कार माझ्या आईने, बाबांनी माझ्यावर आणि माझ्या सगळ्या भावंडांवर केले, त्या गोदाकाठच्या संस्कारांनाच आज गोदावरी सेवा समिती पुढे नेत आहे ते पाहून मला खरोखरच समाधान वाटले.
आज आपल्या समोरची आव्हाने वेगळी आहेत. कुटुंब संस्था हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय समाजाचा एकेकाळी आधार होता, तो आता कुठे ना कुठेतरी डळमळीत होतो आहे, हे आज पाहावे लागत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे काम करताना निम्म्यापेक्षा जास्त तक्रारी कुटुंबाशी संबंधित आहेत. त्याचे निराकरण आपल्याच संस्कारातून करावे लागणार आहे. गोदाकाठच्या संस्कारांनी हेच मला शिकवले. गंभीर समस्यांना तोंड देण्याची बळकटी मला दिली. त्या संस्कारांच्या आधारावरच भविष्यकाळात देखील आणखी चांगले काम करून दाखवीन, अशी ग्वाही विजयाताईंनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलपती डॉ. माधुरी कानिटकर यांनी नाशिककरांना फिटनेस मंत्र दिला. आपण सगळ्यांनी चांगले काम करण्यासाठी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपले पाहिजे. आपल्या संस्कारांमध्येच त्याचा समावेश आहे. हे संस्कार आपण टिकवून वाढविले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. कानिटकर यांनी केले. चाळीशीत फिट रहा, साठीमध्ये उत्साही राहा आणि ऐंशी वयामध्ये स्वतंत्रपणे कामे करा, हा मंत्र माधुरीताईंनी त्यांनी दिला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, आदिवासी विभाग आयुक्त नयना गुंडे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
या नागरी सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने विजयाताई रहाटकर यांच्या हस्ते समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिला सत्कार करण्यात आला. यामध्ये परिवहन, क्रीडा,कला, सामाजिक सेवा, योग आणि आरोग्य, शिक्षण, व्यावसायिक, डॉक्टर्स, आरोग्यसेवा, प्रभावशाली महिला व्यक्तीमत्व, उद्योग, व्यवसाय, आध्यात्मिक, गोदा आरती आणि संस्कृती श्रेणीतील नवदुर्गांचा समावेश होता.
या नवदुर्गांच्या सन्मानाची संकल्पना संकल्पना कविता देवी, दिलीप दीक्षित, दीपक भगत, प्रेरणा बेळे, अंजली वेखंडे, आशिमा केला, जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे, उपाध्यक्ष शांताराम भानोसे, नरसिंह कृपा प्रभु, चिराग पाटील, शैलेश देवी, धनंजय बेळे, शिवाजी बोनदार्डे, रंजितसिंह आनंद, वैभव क्षेमकल्याणी, दिनेश बर्डेकर, राजेंद्र फड, स्वागत समिती अध्यक्ष श्रीनिवास लोया, रामेश्वर मालानी, नरेंद्र कुलकर्णी, गुणवंत मणियार, विनीत पिंगळे यांची होती.
Vijaya Rahatkar award in nashik
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन