विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी लागू करण्यात यावी. यासाठी तसेच ठाकरे बंधूंच्या विरोधात आपण पुढच्या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंदी भाषा सेलचे राज्यप्रमुख पारसनाथ तिवारी यांनी आज गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेतली. यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशाला तोडणाऱ्यांनी राज्यात दोन कोटी हिंदी भाषिक असल्याचे लक्षात ठेवावे. सात कोटी बहुभाषिक होण्यास इच्छुक आहेत तर दोन कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सारखे आहेत. मालदीव मध्ये देखील हिंदी भाषा अनिवार्य असल्याचे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. राज्यामध्ये तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे, त्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा.
देशातील चळवळी या विचारांवर उभ्या आहेत. देशाची भाषा हिंदी आहे. मात्र भाषेच्या नावावर कापाकापी करू नये, असे करणाऱ्यांना घरात बसवा, असे आवाहन करून सदावर्ते म्हणाले, हिंदी भाषेचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे यांनी ‘दोपहरचा सामना’ बंद करावा
राज्य सरकारच्या वतीने त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून राज्यांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला ठाकरे बंधूंनी विरोध केला. या विरोधात त्यांनी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र त्या आधीच शासनाने निर्णय मागे घेतला. त्यामुळे हा मोर्चा देखील रद्द करण्यात आला. त्याऐवजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत पाच जुलै रोजी विजयी मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधू विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Will file a petition against Thackeray brothers for opposing Hindi, warns Adv. Gunaratna Sadavarte
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार